भटके आणि सह्यगिरीच्या कडे-कपार्यामध्ये राहणार्या सह्याद्रीपुत्रांचं फार सुंदर नातं आहे,
ह्या नात्याला निश्चित असं काही नाव नाही पण भटके आणि सह्याद्रीपुत्रांमधला "शिव-सह्याद्री" बंध गेली कित्त्येक वर्ष अतूट-अभंग असाच……… !!
ह्या सह्याद्रीपुत्रांचा डोंगरदर्यातला कौलारू संसार म्हणजे तुम्हा-आम्हा भटक्यांची हक्काची वस्ती,
मागची कसलीच ओळख नसता अगदी मन मानेल तेंव्हा यांच्या घरांची पडवी आपल्यासाठी मोकळी असतेच,
सगळं लटांबर आणि कुडी पडवीत निवांत पहुडल्यावर कोण गावचे? नावं काय? वगेरे विचारण्याचे सोपस्कार………!!!
कधी सह्याद्रीच्या वाटांवरचे वाटाडे होऊन, कधी कसलीही ओळख नसता भरपेट जेवायला घालून, कधी संकटात सापडलेले असता रात्री अपरात्री अवघड डोंगरदर्यात मदतीचा बळकट हात देऊन या सह्याद्रीपुत्रांनी आपल्या भटक्यांसोबतचे अनुबंध नेहमी बळकटचं केले आहेत अगदी सहज वृत्तीने……… !!
या सह्याद्रीपुत्रांनी आपल्या भटक्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीची किमान जमेल तेवढी उतराई करावी या भावनेतून एका कल्पनेचा उदय झाला,
उदय झाला "शिव-सह्याद्री ग्रंथदिंडीचा………"
सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेल्या शाळांची-तिथे शिकणाऱ्या मुलांची अवस्था खरंच बिकट,
शाळेच्या दसकोसातून अवघड डोंगर-दर्या, उफानणारे ओढे-नद्या पार करत पाच-दहा मैल पायपीट करत पोरांना शाळा गाठावी लागते,
ना कळकळ उन्हाची तमा बाळगायची सोय ना मी म्हणणाऱ्या पावसाची,
ये-जा करायला रस्ते नाहीत वाहतूक नाही तेंव्हा टीव्ही-इंटरनेट सारख्या ज्ञानगंगा म्हणजे दिवास्वप्नचं,
तेंव्हा या पोरांना सर्वांगीण जगाची माहिती व्हावी या हेतूने अश्या शाळांमधून किमान २००-३०० सर्वसमावेशक पुस्तकांचं ग्रंथालय सुरु करण्याचं स्वप्न पाहिलं,
योग्य वयात हातात पडलेलं योग्य पुस्तकं एखाद्याच्या आयुष्याची दिशाच बदलू शकतं याचा अनुभव आपल्या सर्वांना आहेच.
थोडे-थोडके पैसे जमा करून सह्याद्रीत किमान एक तरी ग्रंथालय सुरु करावं एवढं छोटं स्वप्न काही जगावेगळ्या अवलीयांच्या मदतीने तगलं,
फक्त तगलं नाही तर प्रचंड विस्तारलं……
अगदी कसलीही पूर्वीची भेट-गाठ नसलेल्यांनी सुद्धा फार मोठी आर्थिक मदत-भरपूर पुस्तकं पाठवली,
कलाकार मित्रांनी कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अतिशय रेखीव "सुलेखन" करून पाठवलं,
छायाचित्रकार मित्रांनी छायाचित्रणाची जबाबदारी न सांगता उचलली,
शिक्षक मित्रांनी शाळकरी मुलांची मानसिकता, विषय-पुस्तकांची निवड ह्याकामी मदत केली,
ह्या सर्वांचे आभार कसे आणि किती मानू हेच समजेनासं झालंय………… !!!
पहिल्या ग्रंथदिंडीला दिवसही अगदीच चांगला सापडला "गुरुपौर्णिमेचा",
आणि शाळा तर त्याहून चांगली, "शिवतीर्थ राजगडाच्या कुशीत वसलेली, वाजेघर गावची"
पहिलं ग्रंथालय शिवतीर्थ राजगडाच्या पायथ्याला होतंय यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं.
आम्ही पुस्तकं द्यायला येतोय म्हणून मुलांनी सजवलेला वर्ग, दाराबाहेर घातलेली रेखीव रांगोळी, शाळेच्या बागेत फुललेल्या फुला-पानांचा बनवलेला पुष्पगुच्छ, लयबद्ध स्वागतगीत, पुस्तकं पाहून हरखलेली पोरं, प्रत्येक पुस्तकाचं पान अन पान निरखून सुखावणारे बालगोपाल पाहून मन केंव्हाच सातव्या आभाळात पोहोंचलेलं………!!!
मित्रहो,
तुम्हा सर्वांच्या मदतीने ग्रंथदिंडीचा श्रीगणेशा तर अतिशय उत्तम झालाय,
येत्या महिन्या-दोन महिन्यात साल्हेरपासून पारगडपर्यंतच्या सह्याद्री पट्ट्यात किमान १० ग्रंथदिड्या पोहोंचवायच्या आहेत तर येत्या वर्ष भरात किमान १००,
या कामी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या मदतीचं खंबीर पाठबळ हवं आहे.
ही सह्याद्रीपुत्र मुलं आर्थिक बाजूने गरीब नक्कीच आहेत पण मानी आहेत-स्वत्व जपणारी आहेत,
आपण त्यांना मदत करतोय ही जरी त्यांची भावना असली तरी आपल्या दृष्टीने ते आपलं कर्तव्यचं आहे………. !!!
तेंव्हा मित्रहो मदतीच्या नाही तर कर्तव्याच्या भावनेतून "शिव-सह्याद्री ग्रंथदिंडी" सह्याद्रीभर पोहोंचवायचा निर्धार करूया………. !!!!!
No comments:
Post a Comment