वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोर्यामधून वाहणार्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
इतिहास[संपादन]
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजीच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते.शिवाजीने जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजीमहाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.अफझलखाच्या वधानंतर शिवाजीच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा --
श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.