! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 28 September 2014

! " किल्ले लोहगड " !

लोहगड

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

भौगोलिक स्थान

लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूरअथवा संबळगड.लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे.तुंग उर्फ कठीणगडहि येथेच आहे.अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.

इतिहास

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिस सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या कोठीत राहाण्याची सोय होते. कोठीत अनेक खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे , जिथे एक सुंदर शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते.नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे.हे तळं सोळाकोनी आहे.मोठा तळ्याच्या पुढे विंचूकाटाकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा बघून आपल्याला राजगडाच्या संजीवनी माचीची आठवण होते. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत. लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. १०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे. लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे. विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या विसापूरवर मोठी सपाटी आहे. तशीच मोठी दगडी तटबंदी आहे. प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत. ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस्तो पहारेकऱ्यांच्या नजरेआड जात नाही. तो व्यवस्थित हेरला जातो. वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा जुना आहे. इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत.लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारान्ती बांधलेला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किलोमीटरवर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु आहे. ३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. तेथून अर्ध्या तासात लोहगड चढता येतो. वाटेत हडशीचा सत्यसाई आश्रम, प्रतिपंढरपूर हे देऊळ आणि पवना धरण बघता येते.



! किल्ले मूरूड जंजीरा " !

! " मूरूड जंजीरा " !

महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यांमुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागर किनाऱ्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक स्थळे आहेत. या किनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

इतिहास

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.जंजिऱ्याचा पुरातन झेंडाजंजिऱ्याचे सिद्दी हे मुळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजीक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

किल्ल्याची अवस्था





जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.जंजिऱ्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.

! " किल्ले तोरणा " !

तोरणा


तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्‌ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये xxxउत्तर अक्षांश व xxxपूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

इतिहास

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.