भंडारदरा
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातीलअहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथेभंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.
भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.
मुख्य आकर्षण
भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असुन दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग, हीना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, आणि देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.)