जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आम्ही आपणास महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती सांगणार आहोत. महाराष्ट्रात एकूण ३५० च्या वर गडद किल्ले आहेत. हे गडकिल्ले आपल्या कायम स्मरणात असावेत तसेच आपणाला कायम आपल्या इतिहासाची आठवण असावी म्हणून किल्ल्यांची माहिती सांगितली आहे. आता आपण कलावंतीण दुर्ग विषयी जाणून घेणार आहोत.
दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्यारांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.
कलावंतीण दुर्ग
कलावंतीण दुर्ग
गडावर पोहचायचे कसे :
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात. आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
‘कलावंतीण दुर्गाचा इतिहास :
कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
कलावंतीण दुर्ग
कलावंतीण दुर्ग
निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराईमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे. मी आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये चढाई करण्यास अवघड सुळका, असे कलावंतीण दुर्ग बाबत म्हणता येईल. प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामधील कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप हिम्मत लागते.
पनवेल आणि कर्जत दरम्यान जून्या मुंबई –
पुणे महामार्गावरून जात असताना प्रबळगड दिसतो. प्रबळगडाच्या परिसरात उल्हास नदी, पाताळगंगा नदी, माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड आणि जवळच माथेरानचा डोंगर आहे. मुंबई पुणे महामार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडकडे पाहिल्यास प्रबळगड म्हणजे महादेवाची पिंड आणि कलावंतीण दुर्ग म्हणजे समोर बसलेला नंदी असे दृश्य दिसते. माथेरानच्या सनसेट पाँईंटवरून दिसणारा सूर्यास्त प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गच्या मध्ये होतो.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माची प्रबळ या गावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते.
शेडुंग मार्गे :
मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल – पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.
माथेरान – प्रबळगड मार्गे :
माथेरानजवळ असलेल्या पिसरनाथ मंदिराजवळून आकसरवाडी गावामधून प्रबळगडचा डोंगर चढता येतो. प्रबळगडावर गिर्यारोहणासाठी माथेरान मार्गे येणारे पर्यटक याच वाटेने येतात. शेंदुंग मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते. परंतु प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहण्यासाठी मुक्कामी जाणाऱ्या गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते. माची प्रबळ गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या परिसरात देखील गिरीप्रेमी तंबू ठोकून राहतात.
कलावंतीण दुर्ग
प्रबळगडचा इतिहास :
प्रबळगड केंव्हा बांधला याची इतिहासात नोंद नाही. परंतु प्रबळगडावर असलेल्या गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड ठरवता येऊ शकतो. बुद्ध कालीन अथवा त्यानंतरच्या कालखंडात या गडाचे बांधकाम झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रबळगडाची मोक्याची जागा पाहता परिसरातील पनवेल आणि कल्याणच्या समुद्रातील प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा, असे म्हणतात. प्रबळगड हा व्यापारी मार्गावर तसेच समुद्र किनार्यापासून जवळच असलेला गड आहे. त्यामुळे शिलाहार आणि यादवांनी येथे लष्करी तळ उभारला होता. यादवांनी त्यावेळी गडास मुरंजन असे नाव दिले होते.
काही काळानंतर मुरंजन अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. त्यावेळी निजामशाहीत असलेल्या शहाजी महाराजांनी मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही असा संघर्ष सुरु असताना मुरंजनावर आश्रय घेतला होता. मुरंजनवर त्यावेळी शहाजी राज्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई साहेब आणि बाळ शिवाजी देखील होते. त्यानंतर इ.स. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला, या तहानुसार मुरंजनवर मोघलांची सत्ता स्थापन झाली.
काही काळानंतर इ. स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठेशाहीचा सरदार आबाजी महादेव यास कल्याणच्या मोहिमेवर पाठवले. त्यावेळी कल्याण, भिवंडीपासून रायरीपर्यंतचा सारा मुलूख आबाजी महादेव यांनी स्वराज्यात घेतला. तेंव्हाच हा मुरंजन स्वराज्यात आला. त्यावेळी किल्ल्याचे नाव बदलून किल्ले “प्रबळगड” असे ठेवण्यात आले. ( प्रबळ गडास प्रधानगड असे देखील म्हणतात.) . इ. स. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड कलावंतीण दुर्ग देखील होता. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी किल्ल्यावर राजपूत सरदार केशरसिंह यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. त्यानंतर झालेल्या केशरसिंह राजपूत आणि मराठ्यांच्या लढाईमध्ये प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आला. पुढे कंपनी सरकारने प्रबळगडला माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य होवू शकले नाही.
कलावंतीण दुर्गाचा इतिहास : (साभार इंटरनेट)
असे म्हणतात कि, पूर्वी कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.
प्रबळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर पाहण्यासारखे तसे काहीच नाही. प्रबळगडावर जात असताना वाटेवर पडलेल्या अवस्थेतील एक बुरुज आहे. प्रबळगडावर गेल्यानंतर आपल्याला दिसते कि समोर पठार आहे. गडावर वास्तूंचे अवशेष आहेत तसेच भरपूर झाडी देखील आहे. प्रबळगडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच भग्न अवस्थेतील नंदी आहे.
प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर गिर्यारोहण करण्यासाठी गिरीप्रेमी येत असतात. कलावंतीण दुर्गचा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी येत असतात. कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते.
माची प्रबळ गावाच्या संरक्षकासारखा त्यांच्या मागे उभा असलेला हा मुरंजन डोंगर माची प्रबळ गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच कलावंतीण दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. परिसरातील लोक प्रबळगडावरील मंदिरामध्ये पूजा करतात.
गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्यास उत्सुक असलेल्या गिरीप्रेमींसाठी प्रबळगड (मुरंजन / प्रधानगड) आणि कलावंतीण दुर्गचे गिर्यारोहण एक पर्वणी आहे.
