निसर्गरम्य परिसर - त्रंबकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेले नयनरम्य स्थान आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पाचूच्या बेटासारखे हे चिमुकले गाव दिसते. मध्यभागी गंगासागर कुंड आहे. गावाचा पाणीपुरवठा येथून होतो. कुशावर्त कुंड तर तीर्थांचे तीर्थ म्हणून समजले जाते. ब्रम्हगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर्स (४२४६ फुट ) उंच आहे. अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून मान्यवर येत असतात. येथे क्षेत्रस्थ ब्राहमणांनी आपल्या यजमान घराण्याच्या पुरातन वंशावली जपल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक ऐतिहासिक मान्यवरांचे हस्ताक्षर आहे.
भगवान शंकराचे हे भव्य मंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला. १७४५ ते १७७५ च्या दरम्यान पेशव्यांनी हे पवित्र कार्य केले. मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात आहे. कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर भव्य आणि पवित्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा भिंत आहे, तर परिसर दगडांनी बांधलेला आहे, आत भक्तांना स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत व पावित्राने आणि मांगल्याने भरलेला आहे. शिवलिग हे स्वयंभू आहे. पिडीत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन होते. दर सोमवारी पालखी निघते. मंदिराचा कळस सोन्याचा आहे.
No comments:
Post a Comment