वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे. हा किल्ला पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कराड यांच्या मध्ये रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. तळबीड गाव वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कराडवरुन एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगड इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.
वसंतगडास भेट देण्यासाठी आधी कराडलाजावे लागते.. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणार्या तळबीडगावात दाखल झाल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.दुसरा रस्ता सुपने या गावातूनही आहे.तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे.कोकणात जाताना खिडींत असणारा हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग होता.
इतिहास[संपादन]
वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्येशिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता[१]. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला . याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला [२]. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.इ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव 'किली-द-फतेह' असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे[संपादन]
गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणार्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसर्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
No comments:
Post a Comment