! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 10 December 2014

॥ शेकरू (महाराष्ट्राचा राज्य प्राणी)



शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारूताई. हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात आढळतो. याचे वास्तव्य आपल्याकडे (अकोले तालुका ) कोथळा परिसरातील देवराया, तोलार्खिंड, कुमशेत, जानेवाडी, येथे शेकरूचे घरटे आढळतात. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून उपयोग करते.

उंच झाडावर शेकरू घ्रर बांधते. झाडाच्या काटक्या मऊ पान यांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घर बांधतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो शेकरू एकावेळेस 1 ते  2 पिलांना जन्म देते.

शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो . सुर्योदय झाल्या शेकरू घराबाहेर पडते ठरलेल्या झाडावर अन्न खाते सकाळी ११ ते ३ आराम करते. पुन्हा सूर्यास्त पर्यंत खाद्य खून अंधारापुर्वी घरट्यात परततो.

असा हा सर्वात सुंदर पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ... चला तर मग करा  शेअर अन सगळ्यांना कळू दया...

Sunday, 23 November 2014

" शालीनी महाल "


कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालीनी राजे यांच्या प्रीत्यर्थ, इ. सन. १९३१-३४ दरम्यान आठ लक्ष रूपये खर्च करून शालीनी महाल बांधला. २.५ मैल व्यासाच्या रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवर, तळयाच्या पश्चिम काठावर सुंदर बागा, उंचच उंच ताडाची झाडे व हिरवाईने हा महाल सुशोभित झाला आहे. महालाच्या बांधकामात काळया दगडामधे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे. इटालियन संगमरवराचा नक्षीकामामरिता केलेला उपयोग वाखाणण्यासारखा आहे. महालाचे दरवाजे लाकडाचें असून, त्यात भारी बेल्जियमची काच वापरून, त्या काचेच्या दरवाज्यावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे. या सा-यामुळे महालाचे राज-वैभव डोळयात भरते. महालातील भव्य कमानी व सज्जा हया चकाकणा-या काळया उंची प्रतीच्या दगडात बनविल्या आहेत. त्यामुळे महालाची एकंदर ऐट व भव्यता पाहाणा-याचे भान हरपून घेते. काचेचे नक्षीकाम व मनो-यावरचे घडयाळ आपले पारंपरिक वैभव दिमाखाने मिरवत आहेत. पौर्णिमेच्या रात्री महालाचे प्रतिबिंब रंकाळयाच्या संथ व शांत पाण्यात, संध्यामठाच्या बाजूने पाहणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" माथेरान "

माथेरान

मुंबई आणि पुणे इथून सर्वात जवळचे आणि तरीही निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे ठिकाण आहे. २,६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी पडलेली माथेरानची ही डोंगररांग हाजीमलंगपासून सुरू होते. १८५० मध्ये ह्युज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने हे ठिकाण शोधून काढले.
मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. या गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे, हे माथेरान भेटीतील एक प्रमुख आकर्षण असते. ही ट्रेन पेब आणि माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून पॅनोरमा पॉईंटला वळसा घालून माथेरानमध्ये प्रवेश करते. इथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. जिथून पुढे वाहनांना प्रवेश नाही त्या दस्तुरी नाक्यावरून २०-२५ मिनीटे चालल्यानंतर मध्यभागी असलेल्या मार्केटमध्ये येतो. बहुतेक हॉटेल्सही याच भागात आहेत.
माथेरानमधील विविध पॉईंटस् - 
शार्लोट लेक - मार्केटपासून १ कि.मी. अंतरावर हे तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे
पॅनोरमा पॉईंट -
उत्तर टोकावरील या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.
सन सेट पॉईंट -
ह्या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. मार्केटपासून अंतर साधारण साडेतीन कि.मी. आहे. सन सेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.
चौक पॉईंट -
हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो. इथे जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईंट.
गार्बट पॉईंट -
येथील सर्वात दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुस-या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. इथे येण्यात खरी मजा पावसाळयात आहे. धुक्यांनी वेढलेल्या जंगलातून पावसाळयात भटकण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी पावसाळाही इथे भेट देण्यासाठीचा उत्तम मोसम आहे. पावसाच्या मा-यामुळे कुठल्याही पॉईंटला जाणे शक्य होत नाही. पण धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळयातही जरूर यावे. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये ब-याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. सांबराच्या कातडयाच्या वहाणा व बूट, तसेच वेताची काठी, छोटया छोटया चपलांचे सेट अशा ब-याच वस्तू इथे स्थानिक विक्रेते विकताना दिसतात. इथे माकडांचे प्रमाण जास्त आहे. आपण खात असताना हातातील खाद्यपदार्थांचा पुडा पळवून नेऊ शकतात, इतकी ती माणसाळलेली आहेत.
माथेरानमध्ये राहण्याच्या ब-याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. इतरही बरीच लहान-मोठी हॉटेल्स आहेत. नेरळ-माथेरान गाडीच्याही मोजक्याच चकरा असल्याने त्या वेळेवर पाळाव्या लागतात. जे स्वतःची गाडी घेऊन येतात, त्यांना गाडया दस्तुरी पॉईंटजवळ लावाव्या लागतात. याशिवाय नेरळ-माथेरान टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

' आंबोली "


ब्रिटीश अधिकारी कर्नल वेस्ट्रूप याने आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसीत केले आहे. सावंतवाडीहून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण दोन दिवस निसर्गसान्निध्यात घालवण्याच्या दृष्टीने हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान इथे जवळजवळ ७५० सेमी. एवढा पाऊस पडतो. यादरम्यान हा पूर्ण परिसर धुक्याने वेढलेला असतो.
सावंतवाडी ते आंबोली घाटात सावंतवाडी संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. इथे देवीच्या मंदिराजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व साधूचा आश्रम आहे. हिरण्यकेशी मंदिरामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. आंबोलीची उंची ६६४ मीटर्स आहे. या परिसरामध्ये सदाहरित, समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णी अरण्य आणि घनदाट जंगले पसरलेली आहेत. आंबोलीपासून १० किलोमीटरवर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे. इथे एम.टी.डी.सी.चे रेस्टहाऊस आहे. त्याच्या मागच्या उद्यानात सांबर, चितळ, भेकर, साळिंदर असे प्राणी ठेवलेले आहेत. याच्या पश्चिमेला महादेवगड, तर उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत.
इथले आरक्षण मुंबईच्या एम.टी.डी.सी.च्या ऑफिसमध्ये होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगाव इथून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे. 

! "" बीजे एक वादळ "" !


" महाबळेश्वर "

महाबळेश्वर

मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.
चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.
महाबळेश्वरची उंची ४,७१८ फूट आहे, त्यामुळे इथून सह्याद्रीतील द-या, कडे-कपारींचे होणारे दर्शन हे निश्चितच वेगळे आहे.ब्रिटीशांच्या नावांनी ओळखले जाणारे इथले विविध पॉईंटस् पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. यापैकी काही पॉईंटस् बाजारपेठेच्या जवळ तर काही १०-१३ किलोमीटरच्या परिघात आहेत. यामध्ये सर्वात प्रसिध्द आर्थर सीट पॉईंट आहे, जिथून महाबळेश्वरच्या सगळया द-याखो-यांचे दर्शन होते. याच पॉईंटपासून खाली असलेल्या विंडो पॉईंटपासून ढवळया घाटाने ट्रेकर्सना कोकणात उतरता येते. महाबळेश्वरपासून पुण्याला जाण्याच्या रस्त्यावर केटस् पॉईंट आहे. इथून कृष्णा नदीवर बांधलेल्या धोम धरणाचा परिसर, डावीकडे घंटेच्या आकाराचा कमळगड आणि समोर दिसणारे पाचगणीचे टेबलटॉप यांचे दर्शन होते. महाबळेश्वरचे पश्चिम म्हणजे लॉडविग पॉईंट. ज्याने १८२४ मध्ये मुंबईच्या उष्ण वातावरणापासून काही दिवस दूर जाता यावे म्हणून महाबळेश्वरचा आणि या पॉईंटचा शोध लावला, त्या जनरल लॉडविगच्या नावावरून या पॉईंटला लॉडविग पॉईंट असे नाव देण्यात आले. इथून पश्चिमेचा प्रतापगड आणि त्या खालचे जावळीच्या खो-याचे निसर्गदृश्य दिसते.
येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.
पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते.

! "" बीजे एक वादळ "" !


" महाराष्ट्र नकाशा "

 





! "" बीजे एक वादळ "" !

" सिंधुदूर्गाची सफर - देवगड किनारा "



समुद्रच्या काठावर वसलेला देवगड किल्ला.
हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्रच्या काठाला देवगड किल्लयाचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्रकिना-याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठया बोटी थेट किना-यापर्यंत येऊन लागत. देवगड किल्ला आनंदवाडी बंदराच्या मागील डोंगरावर वसला आहे. तटबंदी अजूनही ब-यापैकी शाबूत असून आत दीपगृह आहे. किल्ल्यामध्ये वाहन जाऊ शकेल अशी सोय आहे. सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात हा भाग आहे.
दोन टेकडयांमधील देवगडच्या किना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात.
देवगड किना-यावरील पवनचक्क्या. सध्या बहुतेक सगळया बंद अवस्थेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या पवनचक्क्या उभारल्या आहेत.
 
देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.
देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे.
मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर.
वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
विजयदुर्ग किल्ला. जेटीवरून
विजयदुर्ग देवगडपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावरचे देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडचे शेवटचे टोक. मुंबई-गोवा महामार्गावर नरळे येथे उतरून थेट विजयदुर्गला जाता येते. हे अंतर ५५ किलोमीटर आहे. विजयदुर्गच्या रस्त्यावर आजूबाजूला सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. खाडीच्या पलिकडे रत्नागिरी जिल्हा सुरू होतो.
सन ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. सन १२१८ मध्ये देवगिरीच्या यादवांनी तो ताब्यात घेतला. सन १३५४ मध्ये विजयनगरच्या राजानी यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. त्यानंतर १२५ वर्षे हा किल्ला विजापूरकरांच्याकडे होता. सन १६५३ मध्ये शिवराजानी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
किल्ल्यामधील पक्की बांधलेली विहिर.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटर असून बाजूने ४० किलोमीटर लांबीची विजयदुर्ग खाडी आहे. हे एक उत्कृष्ट बंदर आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर आहे. ५ तटबंधामुळे किल्ला मजबूत व अभेद्य झाला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात मारूतीचे मंदिर असून आत शंकराच्या व भवानी मातेच्या मंदिराचे अवशेष सापडतात. किल्ल्याला एकूण २० बुरूज असून आत हत्ती, घोडयांच्या पागा आहेत. पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबाचे ओटे, दोन भुयारी मार्ग इत्यादि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठयांचा अंमल होता. सुमारे ७०० वर्षांहून अधिक स्वबळावर प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभे असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगिज, डच या परकियांनी गिब्राल्टर म्हणून उल्लेख केलेला हा किल्ला मराठेशाहीच्या अपूर्व शौर्याचा वारसा आहे.
दक्षिणेकडील रेड्डी गावापासून सुरू झालेली सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-याची सफर विजयदुर्ग किल्ल्यावर येऊन संपते. अत्यंत रमणीय पण दुर्लक्षित असा हा भाग सहलीसाठी अत्यंत सुरक्षित, कमी खर्चाचा आणि साहसाचा अनुभव देणारा असा आहे. इथला माणूस थोडासा चौकस आहे. पण शहरात दुर्मिळ झालेली माणूसकी तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन केले तर कोणतीही अडचण न येता सहलीचा आनंद उपभोगता येईल.
विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज.
टिप - महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तंबू निवास, पर्यटन निवास उभारलेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही राहण्या-जेवण्याची अडचण भासणार नाही.

! "" बीजे एक वादळ "" !