! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 23 November 2014

" ताडोबा अभयारण्य "


विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबाच्या जंगलाला ताडोबा हे नाव येथील घनदाट जंगलात राहणा-या आदिवासी जमातींच्या तारू किंवा ताडोबा या देवदेवतांच्या नावावरुन पडले असावे असे स्थानिक लोक सांगतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. 625 स्क्वेअर किलोमिटर इतके मोठे याचे क्षेत्रफळ आहे. याचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग असून 1955 पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 1986 मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेले 508 स्क्वेअर किलोमिटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेले आजचे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनही याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात. यात प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. ताडोबा रिझर्व्ह मध्ये चिमुरच्या टेकड्यांचा परिसर येतो तर, अंधारी अभयारण्यात मोहर्ली आणि कोलसा टेकड्यांचा परिसर येतो. अंधारी नदीच्या व्यतिरिक्त असलेल्या पाणथळ जागा अर्थातच कोसला तळे जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये मोडते. याचा 87 टक्के भाग अतिसुरक्षित आहे. जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेडहा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी वनसंपदाही आढळते.
प्राणीसंपदा
ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. सध्याच्या आकडेवारीनुसार येथे 80 वाघ आहेत. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे 195 विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.
या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घोषित झाल्यानंतरही आज इतक्या वर्षांनंतर जंगलाच्या आतील भागात सुमारे 60 लहान-सहान गावे आणि पाडे वसलेले असून विविध भटक्या विमुक्त जमातींचे लोक या ठिकाणी राहत आहेत. या सर्व गावांतील लोकांची संख्या आजघडीला 41 हजार पेक्षाही जास्त आहे. त्यांच्यासाठी चंद्रपूर जल्ह्यातून अनेक ठिकाणांहून ताडोबामध्ये येण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बससेवा उपलब्ध आहे. जंगलाच्या कोर आणि बफर झोन मध्ये केवळ पारंपरिक शेती करणा-यांनाच राहण्यास परवानगी आहे. आधुनिक पद्धतींच्या वापराने जंगल धोक्यात यायला नको हाच यामागे उद्देश आहे. येथील स्थानिक लोक मोहाच्या फुलापासून दारु बनवण्याचा धंदा करतात. त्यासाठी मोहाची फुले गोळा करताना तोडण्यात येणारी झाडे आणि उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे दरवर्षी 2 ते 15 टक्के जंगल जळून जाते.
ताडोबा सफरीचा अनुभव खास वाचकांसाठी

ताडोबा अभयारण्यात पहाटे साडेपाच वाजताच प्रवेश मिळते. एप्रिल महिना असल्याने पहाटेसच उजाडले होते. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे एप्रिलमध्ये उकाडा सुरू झालेला असतो. पण तरीही ती सकाळ मात्र प्रसन्न होती. मग भल्या पहाटे उठून आम्ही निघालो जंगल सफारीला. सुरुवातीलाच दिसला बहिरी ससाणा आणि मेन गेटजवळच्या तळ्यातील सुंदर बदके. त्यानंतर मग अनेक विविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, बारहसिंगे, नीलगायी, हत्ती असे अनेक प्राणी दिसत होते. मात्र ज्या साठी आमची नजर आसुसली होती तो जंगलचा राजा वाघोबा काही दिसेना. तशातच जंगलाचे दोन प्रमुख भाग पालथे घालून झाले आमची सकाळची पहिली राईड संपत आली होती, मात्र वाघाचे किंवा बिबट्याचेही दर्शन न झाल्याने आम्ही थोडे हिरमुसलेले होतो.

मग सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही रिसॉर्टवर परतलो. चहा-नाश्ता करुन मग दुपारी थोडा निवांत वेळ होता. कारण त्या मधल्या वेळेत जंगलच्या नियमांनुसार कोणाही पर्यटकाला जंगलात प्रवेश करता येत नाही. दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपयर्यंत अशी आणखी एक जंगल सफारी आम्ही बूक केली. पुन्हा एकदा देवाचे नाव घेतले आणि निघालो वाघाचे दर्शन घ्यायला.
त्या राईडमध्येही सुरुवातीचा एक तास खूप भटकलो. पण वाघाची काही चिन्हे दिसेनात. एकदा आम्हाला हुलकावणी देऊन तो जवळूनच निघून गेला असे कळले. त्यामुळे तर आणखीनच दु:ख झाले. तरीही आमचा विश्वास होता, की आम्हाला दर्शन होणारच. मात्र बाकी बरेचसे प्राणी दिसत होते. अगदी कोल्हा, रानडुक्कर, एका तळ्याकाळी छान पहुडलेल्या मगरी, सुसरी, विविध पक्षी, साप सारे काही. पण वाघ मात्र दिसण्याचे नाव नाही. अखेर सायंकाळी 5 वाजता एका सफारीच्याच जीपवाल्याने कळवले की, जंगलच्या मध्यावर असलेल्या तळ्यात दोन वाघ बसले आहेत. ते कळले मात्र तातडीने आम्ही आमच्या गाड्या तिकडे वळवल्या. कारण तिथे पोहोचायला आणखी 10 मिनिटे, म्हणजे तेवढ्यात ते निघून गेले तर.. पण यावेळी आमचे सुदैवच. अगोदरच त्या ठिकाणी गाड्या पोहोचलेल्या होत्या. लोकांची गर्दी झाली होती. पण आम्ही पोहोचलो आणि काय वर्णावे त्या राजबिंड्या रुपाचे वर्णन.. पहिले काही मिनिटे तर आम्ही आ.. वासून पाहात राहिलो. आजवर केवळ चित्रात किंवा टीव्हीत पाहिलेल्या वाघाला प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि तेही अगदी 15 फुटांवरुन पाहतानाचा आनंद तो काय वर्णावा.. केवळ अप्रतिम.. पुढे मग त्याच्या सर्व लीला आम्ही हरखल्यागत पाहात होतो. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. ते ऐटीत उठणे, ती डौलदार चाल, शिकारीसाठी धरलेला दबा, मनसोक्त फोडलेली डरकाळी.. सर्व काही अगदी लाजवाब.
ब-याच वेळानंतर मग भानावर आलो. कारण आता निघावेच लागणार होते. अर्थातच जंगलचा कायदा. तेथे आपण पाहुणे. त्या दोन्ही वाघांना अगदी डोळे भरुन पाहून घेत हळूहळू आमच्या जीप गाड्या मागे वळवल्या. पार दिसेनासे होईपयर्यंत सतत त्या तळ्याकाठी नजर जात होती. मग परतताना सुनिताबाई देशपांडे यांचा दर्शनमात्रे आठवला. चार दिवसांच्या ताडोबा सहलिचे सार्थक झाल्याचे भाव सर्वांच्या डोळ्यात होते. शेवटच्या दिवशी का होईना पण जंगलच्या राजाने आपल्याला निराश केले नाही याचाच काय तो आनंद.
पर्यटकांसाठी महत्त्वाचे
ताडोबाला कसे जाल ?
रस्त्याने - धुळे-जळगाव-अकोला-यवतमाळ-चंद्रपूर- ताडोबा
रेल्वेमार्ग - वर्धा स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, किंवा मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसने थेट चंद्रपूर गाठावे. तेथून महामंडळाची बस किंवा कारने थेट ताडोबात प्रवेश करता येतो.
रहावे कुठे - ताडोबात एमटीडीसीचे लॉज आहेत. तसेच प्रायव्हेट रिसॉर्टही अनेक आहेत.


! "" बीजे एक वादळ "" !

Friday, 21 November 2014

" समर्थ स्थापीत ११ मारुती "

समर्थ स्थापीत ११ मारुती

समर्थाची मारूती स्थापना : प्रेरणा व स्वरूप
ज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,तुकाराम आणि रामदास हे संत म्हणजे मराठी भक्तिपरंपरेच्या पंचगंगाच मानल्या जातात. परंतु रामदासांच्या भक्तिगंगेच्या प्रवाहाचे इतर संतांच्या भक्तिप्रवाहापेक्षा असलेले वेगळेपण जाणकल्याशिवाय राहात नाही.
समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ह्यामुळे तात्कालीन समाजस्थितीचे दर्शन त्यांना घडले. सर्वत्र हिंदूंची दैन्यावस्था त्यांनी पाहिली. राम हे त्यांचे कुलदैवत असल्यामुळे आणि राम हा सामर्थ्यसंपन्न असुमारक आणि देवतातरक असल्यामुळे तसेच तो रामराज्य प्रदान करणारा असल्यामुळे त्याची भक्ती करण्याकडे हिंदू जनतेचे मन वळवावे म्हणजेच तिची सद्यस्थितीतून सुटका होईल असा विचार त्यांनी केला. तपश्चर्या करतांना आणि त्यानंतर तीर्थाटन करतांना, रामभक्ती आणि हनुमानभक्ती यांच्या योगाने स्वत:चा उध्दार करून घ्यावा हाच त्यांचा प्रधान हेतू होता. परंतु तपश्चर्या चालू असतांना श्रीराम आणि हनुमान यांनी दर्शन देऊन कृष्णातीरी जगदुध्दार कर कर असा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे, तीर्थाटन करून आल्यानंतर त्यांनी असे ठरविले की आपल्या ओजस्वी वाणीचा, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दीचा उपयोग हिंदू जनतेची मने रामभक्तीकडे वळवून तिला तिच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करावा. 'संसार क्षणभंगूर आहे, मरण केव्हातर येणारच', म्हणून आपले जीवन लोकसेवेत घालविल्यास जन्मसाफल्य होते व तीच रामाची सेवा होय
अशी शिकवण लोकांना द्यायला त्यांनी सुरवात केली. त्याचबरोबर, रामाचा संदेश पोहचवणारा सर्वश्रेष्ठ दास जो मारूती त्यांच्या ठिकाणी असलेल्या बलाची उपासना देखील लोकांना शिकवावी असेही त्यांनी ठरविले. हयासाठी लोकसंग्रह आणि लोकजागृती करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगाव भ्रमण केले आणि कित्येक ठिकाणी मारूतींची स्थापना केली. लोकांना मारूतीच्या उपासनेला लावून धैर्य, वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली.
समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये उत्तर भारतातही मारूतीमंदिरे स्थापन केली. त्यापैकी हनुमंत घाटावरील हनुमान मंदिर, तेलंगणातील हनुमानाचे मंदिर, ही मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतुबंधाजवळील हनुमान मंदिरही प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी कित्येक ठिकाणी मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या. समर्थ रामदास आणि मारूती हया दोन गोष्टीचे साहचर्य लोकांच्या मनात इतके ठसले आहे की एखाद्या ठिकाणची मारूतीची मूर्ती कोणी केव्हा स्थापन केली हे माहित नसेल तर ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली असणार असे गृहीत धरले जाते. तसेच समर्थांनी स्थापन केलेली मूर्ती कोठेही असो, ती ओळखण्याची खूण म्हणजे, रातापुढे मारूतीराय असले की ते हीत जोडूनच उभे असणार आणि एकटे मारूतीराय असले की त्यांचे हात प्रहार करण्याच्या भूमिकेत असणार व पायाखाली राक्षस तुडविलेला असणार!
समर्थांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारूतीची स्थापना केली असली तरी 'समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारूती' म्हणून जे प्रसिध्द आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :
 हया अकरा मारूतीच्या स्थापनेचा जो काळ येथे दिला आहे त्याबद्यल मतभेद आहेत. परंतु शहापूरचा मारूती हया 'अकरा मारूतीत' पहिला याबाबत मात्र मतभेद नाहीत.
वास्तविक समर्थांनी सर्वात प्रथम स्थापिलेली मारूतीची मूर्ती गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथील गोमयाची मूर्ती ही होय. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही मूर्ती आपला शिष्य उध्दव याच्या मारूती उपासनेसाठी स्थापिली. परंतू हया मूर्तीचा समावेश 'अकरा मारूतीत' नाही. तसेच, सज्जनगड येथील मारूती, शिवथर घळींतील मारूती, मिरज, महाबळेश्वर, वाई, तंजावर, टेंभू, शिरगाव येथील मारूती, हयांचाही अकरा मारूतीत समावेश नाही. असे का हयाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. रामदासांच्या विशिष्ट अकरा मारूतींपैकी काहीना कदाचित राजकीय दृष्टया मोक्याच्या स्थानामुळे महत्व दिले गेले असेल, कदाचित समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांतील काहीची स्थापना केली गेली म्हणून त्यांना महत्व दिले गेले असेल, किंवा काहींना अन्य कारणास्तव महत्व दिले गेले असेल; परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अकरा मारूतींना विशेष महत्व दिले गेले आहे ते सर्व मारूती कृष्णेच्या परिसरातील आहेत. 'कृष्णातीरी जगदुध्दार कर' हया दैवी दृष्टान्तामुळे हया कृष्णातीरीच्या मारूतींना विशेष महत्व दिले गेले असावे असाही तर्क काढता येण्यासारखा आहे.
समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-
चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥
पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥

समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
संदर्भग्रंथ - समर्थ स्थापित अकरा मारुती

! "" बीजे एक वादळ "" !


" सुंदरनारायण मंदीर "

सुंदरनारायण मंदीर

नाशिकचे वैशिष्टय असणारे सुंदरनारायण मंदीर हे गोदावरीकाठी अहिल्याबाई होळकर पुलाजवळ आहे.
सुंदरनारायणाचा पुराणात उल्लेख आहे. वृंदादेवी ही अतिशय सुंदर व सुशील असणारी स्त्री जालंदर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. जालंदर दुष्ट राक्षस होता. परंतु तो शंकराचा परम भक्त होता. वृंदादेवीची पुण्याई व जालंदरची भक्ती ह्यावर प्रसन्न होऊन शंकराने त्याला अमर होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यावर जालंदर आणखीनच अहंकारी झाला व पृथ्वीवरच्या मानवांना तसेच स्वर्गात देवतांना त्रास देऊ लागला. इतकेच नव्हे तर खुद्द भगवान शंकरा बरोबर जालंदराने वाद छेडला. असह्य होऊन भगवान विष्णुनी त्यास ठार मारायचे ठरविले.
विष्णू जालंदाचे रूप धारण करून वृंदा देवी बरोबर राहू लागले. अश्या त-हेने वृंदादेवीचे पवित्र्य धोक्यात आहे व तिची पुण्याई संपुष्टात आली. त्यामुळे जालंदरला मारण्यात विष्णूला यश आले. वृंदादेवीला विष्णूची चलाखी लक्षात येताच ती अतिशय संतापली. तिने विष्णूला शाप दिला त्यामुळे भगवान विष्णू पूर्ण काळे पडले. विष्णूंनी गोदावरीत स्नान करून आपली काया परत मिळावली व पूर्वी इतकेच सुंदर ते दिसू लागले. म्हणूनच भगवान विष्णूंना नाव प्राप्त झाले सुंदरनारायण.
नाशिकचे सुंदरनारायण मंदीर १७५६ साली गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी बांधले. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे. कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून बरोबर पश्चिम दिशेला पाहिले की सुंदरनारायण मंदिरातील मूर्तीचे दर्शन घडते. व्हिक्टोरिया पुलाजवळ असलेल्या या मंदिराची रचना भृगशिल्पानुसार आहे. मंदिराचे बांधकाम हे अतिशय आकर्षक असून त्यावर मोगल शैलीचा पगडा दिसून येतो. कारण त्याकाळात बरीचशी मंदिरे मुसलमानांनी नष्ट करून त्याजागी कबरी बांधल्या होत्या. मंदिराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे दरवर्षी २१ मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळी सूर्य किरणे प्रथम मूर्तीवर पडतात. त्याकाळच्या वास्तूशिल्पाचा हा चमत्कारच म्हटला पाहिजे विष्णूच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस लक्ष्मी व उजव्या बाजूस सरस्वती विराजमान आहे.
देवाळाजवळ नदीच्या दिशेने बद्रीका संगम नावाचे कुंभ आहे असे म्हणतात की, देवगिरी राजाने ह्या कुंभात आंघोळ करून सर्व विधी पार पाडले. ह्या कुंभाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सुध्दा आपल्याला आढळतो. असे हे पुरातन मंदीर निश्चितच भेट देण्याजोगे आहे.


! "" बीजे एक वादळ "" !

" करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर "

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर

अनेक पुराणांमधे श्री महालक्ष्मीचा उल्लेख आढळतो. जवळपास ४० किलो वजनाच्या मौल्यवान पाषाणाचा वापर करून देवीची मूर्ती बनविली आहे. हा पाषाण हिरक कणांनी मिश्र आहे. त्यातून मूर्तीचे पुरातनत्त्व सिध्द होते. मूर्तीचे आकारमान शिवलिंगाशी मिळते जुळते आहे. देवीची मूर्ती एका चौकोनी दगडावर उभी असून त्यात वालुका तसेच हिरक सापडतात. श्री. महालक्ष्मी मूर्तीच्या मागे सिंह प्रतिमा आहे. मध्यभागी सहाजिकपणे पद्मरागिणी आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या दोन हातांमध्ये तिने बांबूची ढाल व तलवार धारण केली आहे, तर म्हाळूंगाचे फळ खालच्या उजव्या बाजूच्या हातात तर डाव्या हाती पानाचे तबक धरले आहे. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे. मुकुटावर, भगवान विष्णुची बैठक असणारा फणाधारी शेषागं आहे. हा शेषांग ५ ते ६ वर्षांपूर्वीचा आहे, असा संशोधकांचा कयास आहे. इ. सन. पूर्व १००० पासून मौर्यांची राजवट होती. तर इ. सन. ३० पासून राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापूरास आला व राज्यकर्ता झाला. त्याकाळी एका छोटया मंदिरामधे ही मूर्ती होती.
कर्णदेवाने आजूबाजूचे जंगल तोडले वे हे मंदिर उजेडात आणले. १७ व्या शतकानंतर, अनेक रथी-महारथींनी या मंदिरास भेट दिली व त्यानंतर हया मंदिरास प्रसिध्दी लाभली. श्री. महालाक्ष्मी ही अखिल महाराष्ट्राची देवता बनली. कोल्हापूरास देवस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. या परिसरामधे जवळपास ३५ लहानमोठी देवळे असून, एकंदर २० दुकाने आहेत. हेमाडपंती शैलीने बांधलेल्या या मंदिराचे ५ कळस आहेत. 'गरूड मंडप' हा या मंदिराला लागूनच जोडलेला मंडप आहे.
रात्रौ ठीक १० वाजता देवीची शेजारती होते, त्यावेळी देवीला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. देवीच्या शयनगृहात आरती होते, व त्यावेळी 'निद्राविध' गीते गातात. त्यानंतर दिनक्रम संपवून, प्रमुख आणि उपदरवाजे बंद करतात. दिवसातून एकंदर ५ वेळा देवीची आरती करतात. तसेच महाकाली, मातुलिंग, श्री. यंत्र, महागणपती आणि महासरस्वती यांची सुध्दा आरती व नैवेद्य करतात. दर मंगळवारी व शुक्रवारी आरतीला भाविकांची गर्दी वाढते. मंदिराच्या आवारातील सर्व लहान-मोठया ८७ देवालयांमधे आरती होते. काही भाविक एकापेक्षा जास्त आरती सोहळयांना हजर राहतात. प्रत्येक आरतीला सरासरी १८३ भाविक असतात. आकारती व पंचारती करताना चांदीचा दिवा वापरतात, तर कापूर-आरती करताना, पितळेचा दिवा वापरताता. महालाक्ष्मी मंदिराच्या दैनंदिन आचार विधींमधे, आरती ही सर्वात महत्त्वाची आहे. रोज पहाटे ४ वाजून ३०  मिनीटांनी मंदिर उघडल्यावर, मूर्तीची पाद्यपूजा झाल्यावर, काकडारती करतात. यावेळी भूप रागातील गीते म्हणतात. सकाळी ८ वाजून ३०मिनीटांनी, महापूजा झाल्यावर 'मंगल-आरती' करतात. सकाळी ११.३०  वाजता देवीला सुवासिक फुले, कुंकुम वाहतात. तेवणारा कापूर देवीसमोर धरून तिला नैवेद्य दाखवतात. भाविकांमार्फत कोणी महापूजा घातली नसेल तर, (दूध, दही, साखर, तूप व मधाच्या) पंचामृताऐवजी दूधाने देवीची पाद्यपूजा करतात. दूपारी २ वाजेपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहते. त्यानंतर अलंकारांसहीत देवीची पूजा करतात. मंदिराच्या अंतर्गृहात वेदातील मंत्रोच्चारण होते. संध्याकाळी ७.३०  वाजता, दुमदुमणा-या घंटानादाच्या साक्षीनं देवीची आरती होते. याला भोग आरती म्हणतात. दर शुक्रवारी रात्री देवीला नैवेद्य दिला जातो. आरती नंतर देवीचे अलंकार पुन्हा देवस्थानच्या खजिन्यात जमा करतात.
मंदिरातील हया नित्याच्या आरत्यांव्यतिरिक्त, त्रयंबूली जत्रा, रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळ अष्टमी, किरणोत्सव इ. उत्सव प्रसंगी आणखी एक आरती करतात. श्री. शंकराचार्य, आणि श्रीमान् छत्रपती ज्यावेळी देवळास भेट देतात, त्यावेळी खास आरती करण्याची प्रथा आहे. कार्तिक महिन्यात दिवाळीपासून तो, पौर्णिमेपर्यंत उत्सव करतात. हजारोंनी पुरूष व महिला ज्यास भेट देतात, तो हा उत्सव पाहण्यासारखा आहे.

संपर्क : महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा,
कपिलतीर्थ मार्केटजवळ, ताराबाई मार्ग,
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत,
दूरभाष : ९१-२३१-६२६३७७
kolhapurdistrict.org च्या सौजन्याने

 

! "" बीजे एक वादळ "" !

" जोतिबा "

जोतिबा

सुप्रसिध्द १२ जोर्तिलिंगांपैकी हे एक मंदिर आहे. याला 'केदारनाथ' आणि 'वाडी रत्नागिरी' ही देखील दोन नावे आहेत. माता महालक्ष्मीच्या दानवांबरोबर झालेल्या युध्दामधे जोतिबाने तिला मदत केली आशी आख्यायिका पुरांणांमधे सापडते. हया डोंगरावरती त्याने आपले राज्य स्थापन केले. नाथ पंथीयांचे हे विख्यात दैवत आहे. जोतिबाचा जन्म चैत्र शुक्ल षष्ठीस, पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा हयांच्या पोटी झाला.

कोल्हापूरच्या उत्तरेस, उंचच उंच सुळके आणि हिरव्यागार पर्वतराजींच्या सान्निध्यात, जोतिबाचे देऊळ वसले आहे. इ. सन १७३० मधे, नवाजिसायाने मूळ मंदिर बांधले. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ३३० फूट आहे. आतील मूर्ती चतुर्भुज असून सजावट प्राचीन आहे. त्या परिसरामधे इतर काही मंदिरे व दीपमाळा आहेत. चैत्री पौर्णिमेस इथे भरणाऱ्या जत्रेला अनेक भाविक गर्दी करतात. या यात्रेकरूंच्या हातात, उंच काठया (शासन) असतात. उधळलेल्या गुलालाच्या रंगाने जोतिबाचा अवघा डोंगर गुलाबी झाला आहे. याचा शुभवार रविवार आहे. हया देवस्थानामधे भाविकांकडून तसेच सरकारी पातळीवरूनदेखील बरीच सुधारणा झाली आहे. इथेच एक नवी योजना हाती घेऊन, 'प्लाझा गार्डन' विकसित केली आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

" चांदवड "

चांदवड

महाराष्ट्रात मालेगावच्या जवळ असलेले चांदवड हे एक छोटेसे गाव. पर्वतांनी वेढलेलल्या गावास  धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. चांदवड शहरात फिरायला गेल्यास तिथे आपणास अहिल्याबाई होळकर यांचा रंगमहाल, रेणुका माता मंदिर पहावयास मिळते. तसेच नजीकच्या वडाळीभोई गावाकडे गेल्यास केद्राई माता मंदिर लागते.
रंगमहाल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा महाल स्वत:साठी बनवला होता. या महालात वास्तव्यास असतांना  अहिल्याबाई रेणुका मातेच्या दर्शनास जात असत तसेच विंचूरजवळ असलेल्या विहिरीवरही भेट देत असत. तिथे शत्रूंपासून बचावासाठी सुरक्षित जागा केलेली होती.
रेणुका माता मंदिर : ऋषी परशुरामांनी वडिलांच्या आदेशावरुन आई रेणूका मातेचा वध केला. रेणूका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूर गावाजवळ पडले. त्यामुळेच चांदवडला रेणूका मातेचे मंदिर बांधण्यात आले.
केद्राई माता मंदिर :  वडाळीभोई पासून दक्षिणेला ५ किमी खडकओझर गावाच्या शिवारात हे मंदिर आहे.  अपत्य प्राप्तीसाठी अनेक जोडपे केद्राई मातेजवळ नवस करतात. यावेळी नवस फेडण्यासाठी बोकड बळी दिला जातो. प्रत्येक पौर्णिमेला व अमावस्येला या ठिकाणी यात्रा भरते.  या वेळेस हजारो भाविक नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.  मंदिराच्या बाजूलाच केद्राई धरण असून ते पण फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी अतिशय थंड वातावरण असते.
कसे जाल?
नाशिक पासून चांदवड ६४ किमी लांब असून खाजगी वाहनांनी दिड तासात पोहोचता येते. येथे जाण्यासाठी नाशिकहून बस तसेच छोटया गाडयांची सोयही उपलब्ध आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" सप्तश्रृंगी देवी वणी "

सप्तश्रृंगी देवी वणी

हिंदू पंचागांप्रमाणे साडेतीन मुहूर्त महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा व अक्षयतृतीया. तसेच महाराष्ट्रातील देवींची पुढील प्रमाणे साडेतीन पवित्र स्थाने प्रसिध्द आहेत. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरची कुलस्वामीनी ही तर भाविकांच्या श्रध्देची स्थाने आहेत. साडेतीननावे पवित्र क्षेत्र सप्तश्रृंग गडाची देवी भगवती, महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर्स दूर आहे. नांदूरी गांव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किमी. चा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तश्रृंग गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेली होती. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत.
प्रचंड शीतकडा
तीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. एका सवाष्णीने 'मला पूत्र होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन' असा नवस देवीस केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर पाहता येतात. हा प्रसिध्द शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पाय-या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पाय-या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.
देवीची मूर्ती
सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मुर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. ४७० पाय-या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणा-या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्या वर भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला 'महिषासूरमर्दिनी' असेही म्हणतात.
ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहनी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला सांकडे घालतात.
नवीन सुविधा गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पाय-यांवर छप्पर आले आहे तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लकेटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने काली आहे. सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.

! "" बीजे एक वादळ "" !